भित्यापाठी ...आणखीन भिती....

भित्यापाठी ...आणखीन भिती....


पोटभर  खायला मिळाले कि किती समाधान असते हे भिक्याला आज बरेच दिवसांनी अनुभवाला आले. भिक्याला आज सगळे जग एकदम सुंदर आणि प्रसन्न वाटायला लागले.
आज थोड्या वेळापूर्वीच एका उकिरड्यावर त्याला एक प्लास्टिकचा डबा सापडला होता. त्यात कुणीतरी चार पाच इडल्या टाकून दिल्या  होत्या....थोडा वास येत होता पण भिक्याला खाता आल्या..त्याचे पोट एकदम भरून गेले.
..... या पोटाची योजना या देवाने काही बरोबर केलेली नाही असे भिक्याला नेहमी वाटायचे.दररोज एकदा  तरी , ही पोटाची खळगी भरायला लागते हे काही बरोबर नाही.... ....एकदा भरली कि कमीत कमी आठ दहा दिवस तरी ,परत ती भरायला लागली नाही तर किती मस्त झाले असते. ....आपल्याला दररोज अशी भिक तरी मागावी लागली नसती.येवढे सगळे करून दररोज पोट काही भरत नाही ते वेगळेच.भिक्याच्या डोक्यातून अशा काहीतरी वेगळ्याच कल्पना निघत असत.थोडे शिकायला मिळाले असते तर हा रेल्वेत गार्ड तरी नक्की झाला असता ....असे त्याच्या काही भिकारी मित्रांना वाटे.... गार्ड ची काय शान असते! त्याचा तो पांढरा शुभ्र कोट ,ती कसला तरी बिल्ला लावलेली टोपी ...आणि हातात हिरवा झेंडा!  काय रुबाब केला असता मी..... असे भिक्याला नेहमी वाटे. ... .पण त्याचा हा उजवा पाय ! पोलीओने लहानपणा पासून असा लुळा पडलेला..... तो मात्र बरा झाला पाहिजे !
भिक्याचा  एक पाय लहानपणीच बहुदा पोलिओ मुळे अधू झाला होता. तो अधू उजवा पाय , जमिनीवरून घासत घासत तो सगळीकडे फिरत असे..... आपल्या डाव्या चांगल्या पायावर आपला डावा हात दाबून धरत खुरडत खुरडत सगळीकडे भिक मागत फिरताना त्याला बराच त्रास होई, म्हणून..... बऱ्याच वेळा तो देवळाच्या पायरीवर बसून भिक मागत बसलेला असे.. अस्ताव्यस्त केस, चेहऱ्यावर वाढलेल्या दाढी आणि मिश्या...गुढग्यापर्यंत कशीबशी येणारी एक बरीचशी फाटलेली अर्धी चड्डी आणि अंगात खाकी रंगाचा कधी काळी धुतलेला आणि आता बऱ्याच ठिकाणी फाटलेला शर्ट तो नेहमी घालत असे.......आपला उजवा पाय ओढत चालणारे  त्याचे ध्यान मोठे केविलवाणे दिसत असे. .
आज संध्याकाळी ,असाच काहीतरी विचार करत ,पण भरल्या पोटाने.... भिक्या , नदीपलीकडच्या आपल्या राहायच्या जागेकडे निघाला होता. एक पडका वाडा होता,त्याच्या भिंती शेजारी ताडपत्री लावून त्याने थोडा आडोसा केला होता.  सध्या तरी म्हणजे ..तिथून कुणीतरी त्याला हाकलत नाही तो पर्यंत ....तेच त्याचे घर होते. कुठूनतरी मिळवलेले प्लास्टिक अंथरून त्यावर तो  झोपत असे. ..एक खूप ठिकाणी भोके पडलेले.... त्याला कुठे तरी सापडलेले कांबळे तो अंगावर पांघरत असे. आज भरल्या पोटी झोपायला मिळणार याचा त्याला खूप आनंद झाला होता.
पुलाच्या थोडेसे अलीकडे रस्त्याच्या एका कडेला  त्याला रस्त्यावर काहीतरी पडलेले दिसले. काही तरी हिरव्या  रंगाचा कागद वाऱ्याने फडफड करताना त्याला दिसला. ..
काय असावे हे ?..
तो जरा जवळ गेला.त्या कागदाला एक rubberband बांधलेला होता. त्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघितले.रस्त्यावर कोणीही नव्हते....तो दबकत दबकत आपला उजवा अधू पाय ओढत ओढत अजून जवळ गेला.कसली तरी नोट असावी असे त्याला वाटले. .... तो मग आपला अधू पाय सावरत खाली बसला आणि त्याने तो कागद आपल्या हातात घेतला.नक्कीच नोट होती. सुरळी झाल्याने त्याला एकदम ओळखता आली नव्हती...त्याने rubberband काढून ती सरळ केली. त्याने असली नोट कधी पहिली नव्हती. ...त्याला सगळी नाणी माहित होती...पाच रुपये,दहा रुपये माहित होते.पण ही काही तरी वेगळीच दिसत होती... त्याने परत ती निरखून पाहिली.... संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात बरोबर दिसत नव्हते म्हणून तो तिथून उठला आणि खुरडत खुरडत रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबाखाली गेला....त्याची शंका खरी होती.
बहुतेक ही शंभर रुपयाची नोट होती.
“ बायला ! एकावर दोन गोल! शंभर रुप्य्ये? ?...... खरी हाय का खोटी हाय ?” भिक्या स्वतःशीच पुटपुटला. काही दिवसापूर्वी बऱ्याच नोटा सरकारने खोट्या केल्या होत्या आणि त्या आपण घ्यायच्या नाहीत हे सर्व भिकाऱ्यांना माहित होते. पण १०० रुपयाची नोट अजून चालते हे त्याला माहित होते.शेवटी दोन्ही बाजूना निरखून पहात त्याने ठरवले कि ही नोट खरी आहे.
“ कुणाची पडली बिडली का काय म्हणायची ही?आता काय कराव ? किती वंगाळ वाटलं असल त्या बाबाला ..!” असा विचार करून भिक्या तिथेच थोडा वेळ थांबला. कोणी या नोटेला हुडकत आलं तर त्याला देवून टाकायला पाहिजे.... त्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बघितलं पण त्याला कोणी येताना दिसले नाही. ... आता आपल्याला मिळाली म्हणजे आपली झाली ...आपण थोडा वेळ वाट पण बघितली ..असे काहीसे विचार करून भिक्याने ती सुरळी झालेली नोट सरळ केली.मग त्याची घडी घातली.
आता ही नोट कुठे ठेवावी असा विचार त्याने सुरु केला. त्याच्या गुडघ्यापर्यंत येणाऱ्या खाकी रंगाच्या चड्डीच्या खिशात?...नको...नको... आज भिकेत मिळालेली काही नाणी  होती तिथे. नाणी काढताना चुकून हि नोट खाली पडली तर?...नकोरे बाबा !...शर्टाच्या खिश्यात ? त्या खिशाला भोक नाही ना? याची त्याने दोन तीनदा हात घालून तपासणी केली.... मग शर्टाच्या खिशात त्याने ते घडी घातलेली नोट नीट ठेऊन दिली.त्याला आपण एकदम श्रीमंत झाल्यासारखे वाटायला लागले....काही दिवसापूर्वी नाही तरी एक साधू बाबा त्याला म्हणालेच होते कि ...
“ तू कसला भिक्या तू तर श्रीमंत्या....” त्याला आज ही नोट मिळणार आहे हे बहुतेक त्यांना माहीत असणार!
मग परत एकदा ,त्याने आपल्या  खिश्यावर बाहेरून हात फिरवून नोट तिथे  असल्याची खात्री केली आणि  तो आपल्या खोपाटाच्या  दिशेने निघाला....
“ आजचा दिस फार भारी गेला गड्या तुला....” असे काहीतरी पुटपुटत तो आपला उजवा पाय ओढत ओढत नदीवरच्या पुलाकडे निघाला.एव्हाना सूर्य पूर्ण बुडाला होता आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. पुलावरच्या मध्य भागातले  दोन खांबावरचे दिवे गेलेले होते. तेवढ्या भागात बराच अंधार होता. आत्तापर्यंत दररोज या पुलावरून ये जा करणारा भिक्या आज अंधाराला घाबरला.....आपल्याला कुणी लुबाडून आपली ही नोट पळवली तर?...आपल्या मनात अचानक उगवलेल्या या भीतीशी सामना करत तो पुलाच्या तोंडाशी थोडावेळ उभा राहिला ...पलीकडे जावे आपल्या खोपटाकडे कि आजची रात्र देवळापाशीच कुठेतरी झोपावे?...नको! अजिबात नको! तिथे बरेच भिकारी असतात.हा पूल पार करायलाच हवा....त्याच्या पलीकडे ....त्या खोपटात त्याला खूप सुरक्षित वाटणार होते....जायलाच हवे पलीकडे.त्याने सगळा धीर एकवटला आणि त्याने पुलावर पाउल टाकले......
 थोडे पुढे गेल्यावर त्याला पुलाच्या दुसऱ्या बाजूने पण  रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने कोणी तरी धटिंगण येताना दिसला....बाप रे ! आता हा आपल्याला लुबाडणार कि काय?....अंधारात काही नीट दिसत नव्हते पण त्याला तो धटिंगण  हातात एक दंडुका घेऊन येताना दिसला. ... हातातला दंडुका जमिनीवर आपटत तो भिक्याच्या दिशेनेच येत होता. खरे तर तो रस्त्याच्या तिकडच्या बाजूला होता.....पण आपल्याला बघून हा आपल्या बाजूला येतोय असे भिक्याला वाटायला लागले.....
“ आता माझं काही खरं न्हाय !...ह्यो तर हिकडंच यायलाय... आता काय कराव?” भिक्या पुटपुटला. मागे जावे का पुढे पळत सुटावे. अजिबात  कळेना ....काय तरी पिडा ही ....तरी तो नेटाने पुढे सरकला. त्याला पहिल्यांदा वाटला होता त्या पेक्षा हा इसम बराच धिप्पाड होता. हा इसम आपल्याकडेच बघतोय असे त्याने ठरवले....आला अगदी जवळ आला हा! आपली नोट गेली  आता !.... भिक्याने आपला उजवा हात आपल्या नोट ठेवलेल्या खिश्यावर घट्ट दाबून ठेवला. भिक्या १-२ पावले पुढे गेला आणि त्याच्या छातीचा ठोकाच चुकला....ज्याला आपण कोणीतरी गुंड समजत होतो तो गुंड नव्हता तर पोलीस होता!....
भिक्याच्या कपाळावर घाम फुटला.त्याचे हात पाय थरथर कापायला लागले.....भिक्याला पोलिसांची खूप भीती वाटत असे.. हे उगीचच त्याच्या अंगावर केव्हाही ओरडत , आणि काही वेळा त्याच्या अंगावर लाठी सुद्धा उगारत.एकदा दोनदा त्याने लाठीचा मार पण खाल्ला होता. ...भिक्याला वाटले कि ,ज्या माणसाची नोट हरवली आहे ,त्याने पोलिसात वर्दी दिली असणार आणि पोलीस आता आपल्या मागावर आले असणार ! आपल्याला ही नोट मिळाली आहे हे यांना कसे कळले कुणास ठाऊक?...हा पोलीस रस्त्याच्या तिकडच्या बाजूने गावाकडे जात होता. .... कदाचित याला काही कळले सुद्धा नसेल ... उगीचच आपण घाबरतो आहोत असे सुद्धा त्याला वाटून गेले... हा पोलीस जर आपल्या बाजूला आला आणि आपल्या जवळ आला तर आपण अगोदरच नोट काढून त्याच्याकडे द्यावी का माझ्याकडे काही नाही म्हणावे आणि त्याचा मार मुकाट खावा ... त्याला काही हे ठरवता येईना.
पहिल्यांदा पुलावर दोन ठिकाणी दिवे नाहीत याचा राग आलेला भिक्या आता त्या अंधाराला धन्यवाद द्यायला लागला. .. त्या पोलिसाला आपण दिसणार नाही ...हळूच या अंधारात आपण निघून जाऊ ...या पोलिसाला कळणार पण नाही ....पण आणखी थोडा अंधार झाला तर बरे झाले असते असे त्याला वाटायला लागले. ...अगदी आवाज न करता भिक्या पुढे सरकला ,पण त्याच्या पाय ओढण्याचा थोडा तरी आवाज यायचाच...आता तो अगदी पोलिसाच्या समांतर आला...भिक्याने आपले डोळे मिटून घेतले.देवळात म्हणतात तसे तो “श्रीराम जय राम जय जय राम”  असे मनातल्या मनात म्हणायला लागला.तो बहुतेक पुढे सटकला असे त्याला वाटत असतानाच त्याच्या कानावर आवाज आला.....पोलिसाचा आवाज .... बाप रे! गेली नोट आपली....
“ कोण भिक्या काय रे?....” तो पोलीस त्यालाच हाक मारत होता.
“ होय जी ...मी भिक्याच हाय !.... भिक्या कसाबसा म्हणाला.याने आपल्या चालीवरून आपल्याला ओळखले असणार .....हात तुझ्या ... गेली ..गेली आपली नोट !...भिक्याला वाटले...पण तेवढ्यात तो पोलीस पुढे म्हणाला,
“ सांभाळून जा रे बाबा ! अंधारात काय लांबचं दिसत न्हायी ! कुठतरी पडशील बिडशील....!” तो पोलीस म्हणाला. भिक्याला एकदम लक्षात आले ....अरे हे तर भोसले हवालदार.फार प्रेमळ होते ते.भिक्याला नेहमी काही तरी खायला द्यायचे.त्यांच्या आग्रहाने भिक्या काही दिवस मोठ्या लोकांच्या शाळेत गेला होता. ...त्याला थोडे दहा पर्यंत आकडे आणि काही अक्षरे ओळखता येऊ लागली होती. भिक्याला एकदम हुश्श झाले.... आपण उगीचच घाबरलो.....आपण राम राम म्हणालो त्याचा फायदा झाला असे त्याला वाटले...
“ नीट जातो जी ... तुमी बी आरामात जावा.....” भिक्या म्हणाला आणि आपल्या वाटेला लागला.आता तो पुलाच्या अर्ध्या भागापर्यंत आला होता...पूल संपला कि लगेच उजवीकडे वळायचे ...थोडे पुढे गेले कि आलाच कि पडका वाडा आणि आपली खोपटी.....
आत्ता पोचतो आपण ....सुरक्षित !...
आता मात्र बराच अंधार झाला होता. पण पुढच्या पुलावरचे दिवे चालू होते.पुढचा रस्ता झाक दिसत होता.
“ आता काय भ्या नाय ...चला आता पटकन जाया फाहीजे .....” असा विचार करत भिक्या पुढे निघाला.तरी तो खूप सावध होता. दररोज कसा तो बिनधास्त जायचा ...आज ही नोट मिळाली आणि त्याला सारखे आपल्यामागे कोणीतरी येत आहे असे  वाटायला लागले होते...सारखे पुढे मागे पहात एकदाचा तो आपल्या खोपटापाशी आला. मग जमिनीवर अंथरलेल्या प्लास्टिक वर तो आपला पाय सावरत बसला.एक मोठा निश्वास सोडत त्याने जवळपास कोणी नाही ना याची खात्री करून घेतली.त्याच्यासारखेच दोन तीन भिकारी या वाड्याच्या आश्रयाला होते.पण ते पलीकडच्या बाजूला होते. या भिंती पाशी कोणीच नव्हते....भिक्याने मग हळूच आपल्या खिशात हात घातला आणि ती शंभर रुप्य्याची नोट....परत एकदा बाहेर काढली.
कशी असते ही नोट? एकदा नीट डोळेभरून पहावी असे त्याला वाटले.एकदा त्याला वाटले कि आपण खूप दिवस जपून ठेवलेली मेणबत्ती लावावी आणि ही नोट नीट बघावी.....काय हरकत आहे?...पण त्याने विचार केला जर मेणबत्तीच्या प्रकाशात लाबून कुणाला दिसली तर ?...
“ चोर लई झालेत या भागात !काय भरोसा राह्यला न्हाई या लोकांचा ....” तो उगीचच पुटपुटला.
त्याने मग अंधारातच डोळ्याजवळ नेत ती नोट उलटी पालटी करून बघितली.त्या वरचा तो चष्मा घातलेला एका बाबाचा फोटो बघितला....बहुतेक गांधीबाबा होता तो ....असेल ...असेल...मग त्याच्या डोक्यात आता ह्या नोटेचे काय करावे याचा विचार सुरु झाला.बरेच दिवस त्याचा शर्ट आणि अर्धी चड्डी तो घालत होता.ती बदलून टाकावी का? त्याला पायात घालायला चपला नव्हत्या त्या घ्याव्या का? पण आपल्या उजव्या पायात जातील का त्या? का बूट घ्यावेत? आपले घोंगडे जुने झाले आहे ते बदलून नवीन घ्यावे का?
मग त्याला वाटले आपण हि नोट घेऊन या वस्तू विकत घ्यायला गेलो आणि त्यांनी आपल्याला हि नोट कुठून आणली म्हणून विचारले तर ?.....मोठीच झंझट झाली होती....
मग त्याने ठरवले कि ही नोट आपण बदलून घ्यायला पाहिजे.दहा च्या दहा नोटा मिळवल्या पाहिजेत ...म्हणजे त्यातल्या ४-५ खर्च करू आणि बाकीच्या कुठेतरी लपवून ठेऊ.आता हि नोट कुठे बदलून मिळणार यावर त्याचा विचार सुरु झाला....बराच वेळ त्याला काही कळेना. काय करावे?...कुठे बदलून मिळणार ही नोट?आणि राहिलेल्या नोटा कुठे ठेवायच्या? त्याच्याकडे एक पत्र्याचा डबा होता.त्यात तो थोडी नाणी आणि काही वेळी मिळणाऱ्या नोटा ठेवत असे.हा डबा तो एका पिशवीत गुंडाळून घोंगड्याआड ठेवत असे. पण पाच दहाच्या नोटा ....त्याची या डब्यात ठेवायची त्याची तयारी नव्हती....तो भिक मागायला गेला आणि कुणीतरी तो डबाच चोरून नेला तर?.....
ही एक पीडाच झाली होती.शेवटी त्याने ठरवले कि या नोटा डब्यात ठेवायच्या आणि तो डबा कुठेतरी पुरून ठेवायचा .....ठरले तर ...असेच करायचे.
पण ती जागा कुणाला कळता कामा नये....त्या जागेवर खुणेचा एखादा दगड ठेवायला पाहिजे.
भिक्याने आज पर्यंतच्या आयुष्यात इतका विचार केला नव्हता.....त्याचे डोके दुखायला लागले...त्याने आपले केस दोन्ही हातानी जोर जोरात ओढून बघितले....त्याचे डोके दुखायचे काही  थांबेना.
भिक्याच्या मनात गावचा सावकार सगळ्या गावात खूप पैसे असणारा होता. केव्हडा मोठा वाडा होता त्याचा....
“ आयला ..! ही एक नोट आली तर ह्यो ताप घेऊन आली!.....त्या सावकाराला किती ताप होतोय कुणास ठाव?....त्याच्याकडं बक्कळ नोटा असणार कि ! त्याला तर झोप बी येती कि न्हाय  काय ठाव ?... का असाच जागा राहतोय माझ्यासारखा ?........ या नोटेपाई एका मागून दुसरं भ्या येतच राहतंय कि ! ” भिक्या वैतागून स्वतःशीच पुटपुटला.
 भिक्याला खरे म्हणजे कसल्याही थंडी पावसात किवा बऱ्याच वेळा अर्धपोटी सुद्धा झोप लागत असे. शांतपणे.... त्या रात्री मात्र , त्या बिचाऱ्याला काही स्वस्थ झोप लागली नाही ....
*************************************************************************************
 Jayant Naik
Pune

Comments

  1. I had first published this story on misalpav.com
    I got great response for this . Comments welcome .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आनंदाचे झाड .

नखरेल नयना आणि तिचा प्रताप ..

जगावे का मरावे ?